जळगाव मिरर | ७ सप्टेबर २०२४
गेल्या काही महिन्यापासून नेहमीच रेल्वेच्या अपघाताच्या बातम्या समोर येत असतांना आता नुकतेच इंदूरहून जबलपूरकडे येणाऱ्या ओव्हरनाइट एक्स्प्रेसचे (२२१९१) दोन डबे शनिवारी सकाळी जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले. यामध्ये एक पार्सल आणि एक एसी कोचचा समावेश आहे. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोहोचत असताना हा अपघात झाला. वेग ताशी 20 किलोमीटर होता. रुळावरून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अप ट्रॅक विस्कळीत झाला आहे. ट्रेनमध्ये 10 ते 12 डबे होते.
माहिती मिळताच पश्चिम-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संदीप कुमार या प्रवाशाने सांगितले की, तो कोचमध्ये आराम करत होता. या वेळी असे काही धक्के बसले की जणू काही वेगाने ब्रेक लावले गेले. मला काही समजेल तोपर्यंत ट्रेन थांबली होती. मात्र, काही काळ अपघात झाल्यासारखेही वाटत होते. यानंतर बराच वेळ ट्रेन थांबली. काही वेळाने मी डब्यातून खाली उतरून बाहेर पाहिले तर दोन डबे रुळावरून घसरले होते.