जळगाव मिरर / ६ एप्रिल २०२३ ।
गेल्या मार्च महिन्यात देखील जळगाव जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी त्रस्त झाला होता आता पुन्हा या अडचणीचा शेतकरीला सामना करावा लागणार आहे. एप्रिल महिन्याच्या या आठवड्यात तापमानाचा पारा ३५ च्या घरात राहणार आहे, तर गुरुवार ते रविवार यादरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. त्यामुळे आजपासून चार दिवस शेतकरीसाठी काळजीचे असणार आहे.
एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चाळिशी पार करेल, असा अंदाज गेल्या आठवड्यात व्यक्त करण्यात आला होता. तर गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर असल्याने जळगावकरांना उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तशातच दि. ६ ते ९ यादरम्यान ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल व ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा पुन्हा घसरणार आहे. दि. ९ ते ११ दरम्यान हा पारा ३४ अंश सेल्सिअसच्या घरात असणार आहे. साहजिकच जळगावकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळणार आहे.
