जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२४
राज्यातील नाशिक शहरात एकाच परिवाराने सामुहिक आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना नुकतेच खान्देशातील धुळे शहरात देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे शहरातील देवपूर भागात एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रमोद नगरातील समर्थ कॉलनीत उघडकीस आली असून यात पती गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नी व दोन्ही मुले विषारी औषध प्राशन केलेल्या स्थितीत आढळून आले. शेजाऱ्यांना मुंबई येथे जात जात असल्याचे कारण सांगून गिरासे कुटुंबीयांनी जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण मात्र, समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीणसिंग मानसिंग गिरासे (५२), दीपांजली प्रवीणसिंग गिरासे (४४), सोहम प्रवीण गिरासे (१८) व मितेश प्रवीण गिरासे (१३) अशी चौघा मृतांची नावे आहेत. प्रवीणसिंग गिरासे यांचे शहरात पारोळा रोडवरील आर. आर. पाटील व्यापारी संकुलात कामधेनू अॅग्रो (फर्टिलायझर) एजन्सी आहे. प्रवीणसिंग गिरासे यांच्या भगिनी संगीता योगेंद्रसिंग राजपूत या गिरासे यांच्या घरी आल्या असता ही घटना समोर आली. दोन ते तीन दिवसांपूर्वी चौघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कारण घरात दुर्गंधी पसरली होती. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.