जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांनी दि. 8 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या माध्यमातून लेवा पाटीदार समाजातील मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबनायक रमेशदादा पाटील हे आजारी असल्याचे समजते. अलीकडच्या काळात पंचायतीच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा त्यांचे चिरंजीव ललित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. दि. 8 रोजी रमेशदादा यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या दि. 9 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रमेश दादा पाटील यांना वंश परंपरागत पद्धतीने 1969 साली लेवा पंचायतीच्या कुटुंबनायक पदाची धुरा मिळाली होती. यानंतर तब्बल सुमारे 55 वर्ष त्यांनी या पदावर राहून समाजातील कौटुंबिक कलहाचा न्यायनिवाडा करण्याचे काम केले. रमेश दादा पाटील यांच्या रूपाने लेवा पाटील समाजातील एक खूप मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असून मान्यवरांनी त्यांच्या बाबत शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.