जळगाव मिरर | ८ जानेवारी २०२५
चीनमध्ये सध्या HMPV (ह्यूमन मेटाप्नेयुमोव्हायरस) विषाणूचा प्रादुर्भाव होऊन त्याने मोठा धुमाकूळ घातला आहे, आणि भारतात देखील त्याचे काही रुग्ण आढळले आहेत. यामुळे भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन अलर्ट मोडवर असून, HMPV चा प्रसार रोखण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, HMPV विषाणूची भीती असतानाच, बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव आणि आसपासच्या भागात एका अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसामुळे अवघ्या तीन दिवसांत नागरिकांच्या डोक्याला टक्कल पडत असून, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या गावांतील नागरिकांना एक अज्ञात आजार लागला आहे. या आजारामुळे लोकांना केवळ तीनच दिवसात टक्कल पडत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती मिळाल्याप्रमाणे, काही दिवसांत 40 ते 50 लोकांना टक्कल पडण्याची शक्यता आहे. या आजारात सुरुवातीला लोकांच्या डोक्याला खाज सुटते आणि त्यानंतर केस गळायला लागतात.
मात्र अनेक गावांतील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या मोठ्या प्रमाणात उभी आहे, आणि स्त्रिया देखील याच्या चपेटेतून वाचू शकलेली नाहीत. तथापि, हा प्रकार नेमका का घडत आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काही डॉक्टरांच्या मते, शांपू वापरामुळे केस गळणे आणि टक्कल पडणे संभवते, पण अशा लोकांचे केस गळत आहेत जे कधीच शांपूचा वापर करत नाहीत किंवा त्याला हातही लावलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये एक मोठी चिंता आणि गोंधळ निर्माण झाला आहे, कारण हा अज्ञात कारणाने होत असलेला केस गळण्याचा प्रकार समजायला सोप्पा नाही.