जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२५
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील सुलेमान रहीम पठाण याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर चर्चेत आलेल्या जामनेर येथील संबंधित कॅफेला पोलिसांनी मंगळवारी सील ठोकले होते. बुधवारी शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संकुलांतील ८ ते १० कॅफेवर धाड टाकून त्यातील साहित्याची मोडतोड केली. काही कॅफेंमध्ये पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचा संशय बळावला आहे.
२० वर्षीय सुलेमान हा सोमवारी दुपारी एका कॅफेत बसला असता संशयावरून जमावाने त्यास जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शहरातील इतरही कॅफेमध्ये गैरप्रकार चालतात, अशा तक्रारी यापूर्वीच पोलिसांकडे होत्या, अशांवर पोलिसांनी बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. खासगी क्लासेस तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात हे कॅफे आहेत. पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत कॅफेवर कारवाई सुरू केली. शहरातील कॅफेमध्ये चालणाऱ्या गैरप्रकाराबाबत येथील सामाजिक कार्यकर्ता अविनाश बोरसे यांनी पोलिसाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
कॅफेमध्ये बसण्यासाठी अगदी छोटी जागा असून, सर्वच कॅफेत वरच्या मजल्यावर छोटे-छोटे टेबल लावून पडदे किंवा पार्टीशन लावण्यात आले असल्याचे दिसून आले. उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलिस संदेश कीर्तिकर, चंद्रकांत पाटील, दीपक जाधव, योगेश पाटील, अमोल पाटील, महेंद्र राठोड, नंदलाल परदेशी, प्रीतम बरकले, चंद्रशेखर नाईक तसेच नगरपालिकेचे अमर राऊत, अमित आहेर, विजय सपकाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.




















