जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२३
सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून असो कि महाविद्यालयातील मैत्री असो या मैत्रीमध्ये अनेक घटना घडत असतात, तर काही तरुण -तरुणी एकमेकावर प्रेम देखील करू लागत असतात, काहींचे प्रेम खरे असतात तर काहींचे प्रेम काही तरी फायद्यासाठी असते अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात घडली आहे. एका तरुणीने आपल्या २८ वर्षीय प्रियकराला लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, असा सारखा तगादा लावणार्या प्रेयसीला कंटाळून प्रियकराने किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील तरुणीसह तिच्या मैत्रिणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय तरुणाची इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये एक वर्षांपासून प्रेम निर्माण झाले मात्र तरुणीने लग्नासाठी तगादा सुरू केला तसेच लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, अशी मागणी केली तसेच रक्कम न दिल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गुरुवार, 7 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चिखली शिवारातील शेतात तरुणासोबत पुन्हा तरुणीने लग्नासाठी तगादा लावला व लग्न न केल्यास चार लाखांची मागणी केली.
तसेच तरुणीसोबतच्या मैत्रिणीनेदेखील चिथावणी दिली. धमकीला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने किटकनाशक प्राशन केले व त्यास उपचारार्थ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तरुणाने दिलेल्या जवाबावरून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रघुनाथ पवार करत आहेत.