जळगाव मिरर | २७ जून २०२५
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शक्तिपीठ महामार्गाकडे पाहिले जात आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने 20,000 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. तसेच या महा मार्गासाठी भूसंपादनास देखील मान्यता देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला आहे. यासाठी राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे बंगलोर एक्स्प्रेसचे उदाहरण दिले आहे.
या संदर्भात राजू शेट्टी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून ‘देवा भाऊ तुमच्या पेक्षा गडकरी साहेब बरे, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेवर टाकत आहात दिवसा दरोडे’, अशा शब्दात टीका केली आहे. यामध्ये त्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या 802 किलोमीटर कामासाठी 86 हजार कोटी रुपये तर पुणे बंगलोरच्या 700 किलोमीटर कामासाठी केवळ 50 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा उल्लेख केला आहे. म्हणजेच पुणे बंगलोर मार्गासाठी प्रति किलोमीटर 71 कोटी 42 लाख रुपये तर शक्तिपीठ साठी 107 कोटी 23 लाख रुपये खर्च होणार आहेत, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर व गोवा या दोन शहरांना जोडणार आहे. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभी, बीड, लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग मार्गे गोव्यापर्यंत जाणार आहे. पण या महामार्गात अनेक सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. परिणामी, सरकार व शेतकरी यांच्यात या मुद्यावरून तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. नांदेडच्या मालेगाव येथे शेतकऱ्यांनी या महामार्गाविषयी काढलेल्या आदेशाची होळी केली आहे. इतकेच नाही तर धाराशिव आणि इतर जिल्ह्यात देखील या निर्णयाला विरोध झाला आहे.




















