जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२४
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे उद्या २८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नामांकन रॅलीचे देखील नियोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होणार आहे तेथून पुढे जुने तहसील कार्यालय , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गणेश रोड तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे.
मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या हस्ते यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महायुतीच्या नेत्यांची देखील यावेळी उपस्थीती असणार आहे. आ.चव्हाण यांनी प्रचारात देखील मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई देखील त्यांच्या बरोबरीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आमदार चव्हाण यांच्या हिंगोणा गावातील नागरिकांनी तर सामुहिक शपथ घेऊन सगळं गाव चव्हाण यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व नागरीक यावेळी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहणार असून पन्नास हजारांहून अधिक मतदारांच्या हजेरीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. हि निवडणूक आता फक्त माझी एकट्याची नाही तर ही निवडणूक आता नागरिकांनी डोक्यावर घेतली आहे. म्हणून या ऐतिहासिक दिवशी मित्रपक्ष, नागरिक सर्वांनी सहभागी होऊन या दिवसाचे साक्षीदार बनावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.