जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरात मुलगी अल्पवयीन असतांना तिच्या आई वडीलांनी तिचे लग्न लावून दिले. यावेळी तिच्या पतीकडून झालेल्या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहून तीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या पतीसह सासू, सासरे आणि आईवडीलाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. ती अल्पवयीन आहे हे माहित असतांना तिच्या आईवडीलांनी तिचे लग्न उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका तरूणाशी ऑगस्ट २०२२ मध्ये लावून दिले. तिच्या पतीने देखील ती अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीतेने मुलीला जन्म दिला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरे आणि आईवडीलांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि दयानंद सरवदे हे करीत आहे.