जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२४
पुतण्याला मुलगा झाला म्हणून कुटुंबासोबत पुणे येथे गेलेले आणि परत घरी येत असलेले ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचे निवृत्त क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम लालजी बंगाली (वय ६४) यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ७ वाजता राहत्या घरून निघणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हायवे दर्शन कॉलोनी गट नंबर ७८, निमखेडी रोड येथे राहणारे पुरुषोत्तम बंगाली हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या पुतण्याला मुलगा झाल्याने कुटुंबांतील सर्व सदस्यांसोबत ते बाळ व बाळंतिणीला बघण्यासाठी पुणे येथे गेले होते. परत येत असताना ते एकटेच रेल्वेने येत होते. त्यांचा पुणे स्थानकावर रेल्वेतून पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. घरातील इतर सर्व सदस्य कार करून गेले होते. गुरुवारी कराष्टमीच्या उद्यापनासाठी सर्व कुटुंबिय जळगाव येथील घरी परतणार होते. पुरुषोत्तम बंगाली यांना कार, बसच्या प्रवासात उलट्यांचा त्रास होतो म्हणून ते एकटेच महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगावकडे परत येत होते. त्यांचा गुरुवारी रात्री रेल्वे स्थानकावरच अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पुरुषोत्तम बंगाली हे एमको कंपनीचे निवृत्त व्यवस्थापक विवेक बंगाली यांचे लहान बंधू होत.