जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील अनेक शहरात बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्यावर जिल्हा पोलीस कारवाई करीत असतांना नुकतेच शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरातील जुना खेडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शनीपेठ पोलीसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळील जुना खेडी रोड वर एक अल्पवयीन मुलगा हा हातात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरीष्ठ पोलीसांच्या आदेशानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोहेकॉ विजय खैरे, विक्की इंगळे, योगेश साबळे, मुकुंद गंगावणे यांनी गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता कारवाई केली. यावेळी पोलीसांना पाहून अल्पवयीन मुलगा हा पळण्याच्या तयारीत असतांना शनीपेठ पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.