जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२४
सत्तेत सहभागी होण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी आपला मानसन्मान, स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवू देणार नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सहकार परिषदेत दिला. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी समुद्रमार्गे अतिक्रमणे होत आहेत, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जमिनी वाचवण्यासाठी साऱ्यांनी एक व्हा, असे आवाहन ठाकरे यांनी केली.
कर्जत तालुक्यातील धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्ट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेची सहकार परिषद आणि दोनदिवसीय सहकार शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन शनिवारी राज ठाकरे यांनी केले, या वेळी ते बोलत होते. या वेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, पक्षाचे नेते शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, पक्षाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी मराठी माणसे उद्योग, व्यवसाय करू शकत नाही, अशी आवई उठवली जाते. हजारो मराठी माणसे उद्योग, व्यवसाय करतात, मात्र ते प्रसिद्धीपासून लांब असतात. या ठिकाणी मनसेने दोन दिवसांचे शिबीर भरवले आहे, त्या रिसॉर्टचे मालक मराठी आहेत. हे ऐकून समाधान वाटले, असे ते म्हणाले. तसेच मराठी व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या पाठीशी सर्वांनी ठाम राहिले पाहिजे, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली. तसेच जगातील सर्वात नावाजलेले परफ्युममधील अर्क हा ठाणे शहरातील केळकर अत्तरवाले यांच्याकडून जातो, हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे मराठी उद्योजकांना पाठिंबा द्यायचा नसेल तर किमान टोमणे तरी मारू नका, असा सल्ला त्यांनी राजकारण्यांना दिला.
राज ठाकरे यांनी सहकार परिषदेच्या व्यासपीठावरून राज्यातील राजकारण्याकंडे वळवला आणि मी या ठिकाणी सहकार चळवळ शिकवायला आलो नाही, पण सहकार चळवळ पुढे कशी न्यायची हे सहकार मध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि तज्ज्ञ करत आहेत. मात्र, सहकारमधील सर्वांना एकत्र येण्याची चळवळ काय असते, हे महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांत दिसत आहे. सहकार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी त्या योग्य काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. काहीजण पैशांसाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी लाचार झाले असून, त्यांनी इकडून तिकडे उड्या मारण्याचे काम स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याचे सांगत त्यांनी आपली मनं आणि स्वाभिमान गहाण ठेवला असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवू देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
महात्मा फुले यांनी सुरू केलेली सहकार चळवळ टिकली आहे. आज महाराष्ट्रात जमिनी काबीज करण्याचे कारस्थान पैशेवाल्यांनी सुरू केले आहे. ७०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रमार्गे आपल्या प्रांताला धोका आहे, असे सांगून ठेवले होते. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. निवडणूक जाहीर झाल्यावर या पिशवीतून काय काय बाहेर येईल, हे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या राजकारण्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा राज ठाकरे यांनी पक्षाच्या सहकार शिबिरातून दिला. या शिबिरात शनिवारी वित्तीय सहकार संस्था या विषयावर राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सहकारी पतसंस्था या विषयावर, तर दुसऱ्या सत्रात मुंबई सहकार बोर्डाचे अध्यक्ष सुरेश म्हसे यांनी सहकारी सेवा संस्था कार्यप्रणाली या विषयावर मार्गदर्शन केले.