जळगाव मिरर | २० जानेवारी २०२४
जळगाव शहरात मालमत्तेचे प्रकरण कमी पैशात सेटल करून देतो असे सांगून व अश्लिल भाषेत बोलत ३९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जितेंद्र राणे याच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दि. १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय विवाहिता व तिची दिराणी जळगावातील बहिणीला भेटण्यासाठी जात असताना भजे गल्लीकडून आलेला जितेंद्र राणे नामक व्यक्ती विवाहितेजवळ आला व म्हणाला, मालमत्तेचे प्रकरण कमी पैशात सेटल करून देतो. तसेच अश्लिल भाषेत बोलत तिला दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. दिराणी अडवण्यास गेली असता तिला राणे याने शिवीगाळ केली. या प्रकरणी विवाहितेने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करत आहेत.