जळगाव मिरर / ७ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज मनपाच्या महापौर जयश्रीताई महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे निवेदन महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांचे नेतृत्वात देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, जळगांव शहरात महानगरपालिका व बांधकाम विभागामार्फत रस्त्याची सुरु असलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहे. त्यात महाबळ, जिल्हापेठ, रामानंद नगर, गणेश कॉलनी, शिवराम नगर, गणेश कॉलनी ते कोर्ट रस्ता, बळीराम पेठ मधील रस्ते या सर्व रस्त्यांच्या कामाचा दर्जा व त्यात वापरण्यात येणारे डांबर व खडी हे निकृष्ट दर्जाचे असून रस्त्याची लेव्हल पातळी न पाहता काम केलेले आहे. पाणी वाहून जाण्यासाठी उतार वगैरे इ. तांत्रिक बाबींचा कोणत्याही प्रकारे विचार न करता रस्ते तयार केले जात आहेत. या सर्व बाबींचा विचार करण्यात येत नसून सार्वजनिक बांधकाम विभाग व म.न.पा. चा कोणताही अभियंता/कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने मक्तेदाराची मनमानी वाढली असून पाहिजे तसे मटेरीयल वापरत नसून या सर्व कामांची थर्ड पार्टी ऑडीट करुन चौकशी करण्यात यावी.
आम्ही या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने वेळोवेळी निवेदने देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपण क्वॉलीटी कंट्रोल डिपार्टमेंट कडून वापरण्यात आलेल्या साहित्याच्या दर्ज्याची तपासणी करावी, तो पर्यंत कुठल्याही प्रकारची बिले काढण्यात येवू नये. तसेच मेहरुण परिसरातील सर्व्हे नं. २५८ / १ व २ चे मालक यांनी महानगरपालिकेने महादेव मंदिरासमोरील नाल्यासाठी संरक्षण करण्यासाठी आर. सी. सी. नाल्याचे बांधकाम केलेले आहे. त्यावर श्री श्री पार्क यांनी या ठिकाणी लेआऊट टाकून प्लॉट पाडलेले आहेत व नाल्याच्या बाजुने कोणतीही मार्जीन किंवा ५ फूट रस्ता न सोडता त्यावर संरक्षण भिंतीवरच बांधकाम केलेले आहे.
तरी महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ले-आऊट धारकाला (मक्तेदाराला) एक प्रकारे मदत केली जात आहे. या भागातील बांधकाम अभियंता मक्तेदाराच्या पाठीशी असून त्यामुळे संरक्षण भिंतीवरच ४ फूटांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. संरक्षण भिंतीवरचे हे बांधकाम ताबडतोब तोडण्यात यावे व प्लॉट धारकांना नियमानुसार त्या बाजुने नाल्यापासून ८ मीटरचा रस्ता सोडण्यात यावा ही विनंती. असे न केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने हे बांधकाम तोडण्यात येईल याची दखल घ्यावी. इच्छादेवी ते डी मार्ट पर्यंतचा रस्ता दोन्ही बाजुने १५ मीटर असून राईट बाजुन ७/५० मीटर व लेफ्ट बाजुने ७/५० मीटर पाहिजे परंतु लेफ्ट बाजुने एका ठेकेदाराचे हित मनपा प्रशासन अधिकारी जोपासत आहे. दोन्ही बाजुने सारखे माप घेवून रस्ता बनविण्यात यावे. तसेच डी मार्ट समोरील भिंत ही पूर्णपणे रस्त्यात येत असून त्याचे अतिक्रमण मनपा प्रशासन का काढत नाही. यात मनपा प्रशासनाचे हात ओले झालेले दिसून येत आहे. डी मार्टचे अतिक्रम दोन्ही बाजुने सारखे १५ मीटरचे अंतर प्रमाणे काम न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. निवेदनावर रिंकू चौधरी, इब्राहीम तडवी, हितेश जावरे, रफिक पटेल, रहीम तडवी, राजू मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहेत.