जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना महायुतीमध्ये देखील आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी महायुतीमधील वाद मिटविला असल्याचे दिसून येत आहे. रविवारपासून 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात स्वतंत्रपणे बंदद्वार चर्चा केली. 2019 मध्ये शिवसेनेने 126 जागा लढवल्या होत्या.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आमचा सक्सेस रेट मित्रपक्षांच्या तुलनेत चांगला आहे, त्यामुळे यंदाही आम्हाला विधानसभेच्या 126 जागा मिळाव्यात, अशी मागणी शिंदेंनी या वेळी केली. मात्र 2019 मध्ये युतीत दोनच मोठे पक्ष होते, आता तीन झाले आहेत. भाजपलाही 150 हून अधिक जागा लढवायच्या आहेत. त्यामुळे शिंदेसेनेला 80 ते 85 जागा देण्याबाबत सकारात्मक विचार होऊ शकतो, असे अमित शहा यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपला 150 व शिंदेसेनेला 80 जागा मिळाल्यास उर्वरित 58 पैकी 50 जागा अजित पवार गटाला मिळू शकतात. अजित पवार गटाला 60 ते 65 जागा हव्या आहेत. पण लोकसभा निवडणुकीत त्यांची खराब कामगिरी झाल्यामुळे अमित शहा दादांच्या मागणीला अनुकूल नाहीत.