जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२४
राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यातील ‘लाडक्या बहिणींना’ रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याचा कार्यक्रम आखला असून आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी ४० लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १ कोटी अर्जांची छानणी सुद्धा पूर्ण झालेली आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. दरम्यान, १७ जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच ३ हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.