जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।
कोरोना काळापासून निर्बंधांमुळे गेली ३ वर्षे रामनवमी साध्या पद्धतीने साजरी झाली. परंतु या वर्षी कोणतेही निर्बंध नाहीत व अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे मंदिर निर्माण कार्य पूर्णत्वाकडे असल्यामुळे मोठ्या उत्साहाने हा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये शहरात सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे.
विश्व हिंदू परिषदेतर्फे सर्व प्रखंडमध्ये रामउत्सव साजरा केला जाणार असून, सामूहिक प्रतिमा पूजन, श्रीराम मंदिरात जन्म सोहळा, सामूहिक आरती असे नियोजन केले आहे. नागरिकांनीदेखील घरावर भगवा ध्वज लावून संध्याकाळी अंगणात सडा, रांगोळी टाकावी व अंगणात तेलाचे ९ दिवे लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. लाडवंजारी समाज श्रीराम मंदिरात अभिषेकासह जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. सायंकाळी शोभायात्राही काढण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांनी सांगितले.
शनिपेठ मित्रमंडळातर्फे गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता शनी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात श्री रामरायाच्या मिरवणुकीत शिवगंध ढोल पथक, तसेच दीडशे महिलांचे लेझीम पथक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांनी सांगितले. श्रीराम मंदिर संस्थान येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बसस्थानक समोरील चिमुकले श्रीराम मंदिरात १० वाजता दादा महाराज जोशी यांचे रामजन्माचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा होईल.
