जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी विनयभंग व अत्याचाराच्या खळबळजनक घटना घडत असतांना नुकतेच अकोला जिल्ह्यात देखील एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका जन्मदात्या बापासह, सावत्र बाप आणि काका यांनीच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी समोर आल्याने पुन्हा एकदा समाजमन सुन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहा वर्षांच्या चिमुरडीवर वडिलांच्या नात्यातील एका वीस वर्षीय युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी युवक अटकेत असतानाच आता पोलिस तपासादरम्यान त्या चिमुरडीवर जन्मदात्या बापानेही दारू पिऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीचे आई-वडील नातेवाइकांकडे आले होते. अल्पवयीन मुलीला त्यांच्याकडे ठेवून दोघे बाहेर गेले. यावेळी मुलीच्या वडिलांचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केल्यावर जन्मदात्या बापानेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले.