जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने वाळूमाफियामध्ये राडा होत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करीत असताना कोतवालाने फोटो काढले. त्यावर वाळूमाफियाने हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. याप्रकरणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा होत होता. तो रोखण्यासाठी गावाबाहेर चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा बंद होता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाक टुकी येथील काहीजण चाऱ्या बुजवत होते. याबाबत कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजले. त्यांनी तेथे जाऊन त्यांना त्याचा जाब विचारला. याचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाल कोळी यांनी त्यांच्याजवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यावेळी तेथे एकच खळबळ उडाली, तर गावात त्याचा आवाज झाल्याने तेथेही धावपळ उडाली. हवेत गोळीबार केल्यानंतर ते पळून गेले. माहिती कळताच पाळधी पोलिस गावात पोहोचले.
ही घटना चांदसर येथे मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश कोळी, आबा कोळी, गणेश कोळी, मोहन कोळी, कल्पेश पाटील, राहुल कोळी, राहुल कोळी तसेच गोपाल कोळी, दीपक कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रशांत कंडारे, मधुकर उंबरे व सहकारी करीत आहेत. घटनास्थळी चोपडा भागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी घोलप, पो. नि. पवन देसले यांनी भेट दिली. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.