जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५
भडगाव ते वाक दरम्यान वाळूने भरलेल्या डंपरने धडक दिल्याने ३ म्हशी ठार तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, मयत म्हशीना डंपर खालून चक्क जेसीबीने ओढुन काढावे लागले, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यावरून धडकेची तीव्रता लक्षात येते. याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील पेठ भागातील पशुपालक आपल्या म्हशी शेतात चारण्यासाठी घेऊन जात होते. भडगाव ते वाक दरम्यान जुना महिदंळे रस्त्याच्या अलीकडे विटभट्टीजवळ वाक गावाकडून भडगावकडे येणारा टाटा कंपनीचा डंपर (एमएच-४३, बीपी-७८४२) ने समोरून येणाऱ्या म्हशींना जबर धडक दिली. यात चार म्हशींपैकी ३ म्हशी जागेवर ठार झाल्यात. तर एक म्हशीला गंभीर इजा झाली आहे. धडकेची तीव्रता इतकी जबर होती की, चारपैकी तिन म्हशी जागीच मयत होवून डंपरखाली अडकल्या होत्या. त्यांना जेसीबीच्या साह्याने डंपरखालून ओढून काढवे लागले. म्हशींना धडक देणारे हे डंपर तालुक्यातील वाक येथील माजी सरपंच यांचे असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.
घटनेची माहिती मिळताच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. म्हशींना धडक देणारा हा डंपर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा व भरधाव वेगाने रस्त्यावरुन धावत होता. असे असताना ही डंपर चालक, मालक यांच्याविरुध्द कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. धडक देणारा डंपर सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून असल्याचे दिसून आले.