जळगाव मिरर | १५ जून २०२५
राज्यातील सर्व शाळांमध्ये १६ जून २०२५ पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, त्यानिमित्ताने “शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर उत्साहात, प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, राज्याचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शाळेत जाऊन प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा प्रवेशोत्सावासाठी सज्ज आहेत. जिल्ह्यातील सर्व मंत्री त्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील,वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड जिल्हा दौऱ्यावर आहेत ते पण शाळेला भेट देतील खासदार, आमदार यांनाही भेट देण्याची विनंती केली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्या शाळेत जावे या संदर्भातील लेखी सूचना जिल्हाधिकारी यांनी काढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधित विभागांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेस भेट देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे रांगोळी, तोरण, पुष्पवर्षाव, गुलाबपुष्प वितरण आदींनी स्वागत करण्यात यावे.गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी होणार असून, या वितरणास संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करावा.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करणे आणि सर्व पात्र मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे याची खातरजमा करणे अपेक्षित आहे.कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत.
जे अधिकारी शाळेत जातील त्या अधिकाऱ्यांनी वर्गखोल्या, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रयोगशाळा, पोषण आहार, क्रीडांगण आदींचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना स्वच्छता, वाचन, सांस्कृतिक उपक्रम, खेळ, आणि शैक्षणिक प्रगतीबाबत प्रेरित करावे.महिला बचत गट, युवक मंडळे, स्थानिक संस्था, पालक, आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रीय सहभाग घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत.
१२ ते १४ जून २०२५ दरम्यान शाळांचे स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद, समाजकल्याण, आदिवासी विकास, नगरपरिषद यांच्याकडील आश्रमशाळांना विशेष भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
“शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे; पहिल्या दिवशी स्वागत हा नव्या वाटचालीचा आरंभ असतो,” असे म्हणत शासनाने या उपक्रमासाठी सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणाची गंगा घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून दृढ करण्यात येणार आहे.




















