जळगाव मिरर / ३ मे २०२३ ।
टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली डॉ. उल्हास बेंडाळे यांची ११ लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कोलकाता येथून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून आठ मोबाइल, तीन हार्डडिस्क, लॅपटॉप, आठ एटीएम कार्ड आदी साहित्य जप्त केले. रिकोर्ड क्रिस्टफर गोम्स (३६), प्रियांशू सैवाल बिसवास (२३), अनिकेत अभिजित बिसवास (२४, सर्व रा. कोलकाता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
डॉ. उल्हास बेंडाळे व त्यांच्या दहा सहकाऱ्यांना सेव्हन सिस्टर पाहण्यासाठी जायचे होते. त्या अनुषंगाने त्यांनी फेसबुकवर थींकट्रीप ट्रॅव्हल्स या नावाची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना संबंधित व्यक्तीने अॅडव्हान्स ३ लाख १५ हजार रूपये तसेच टूर बुक झाली म्हणून ७ लाख २० हजार रूपये आणि आरटीपीसीआर व क्वारंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी ६८ हजार ८०० रूपये असे लागतील असे सांगण्यात आले. त्यानुसार बेंडाळे यांनी ११ लाख ३ हजार ८०० रुपयांची रक्कम भरली. दरम्यान, काही दिवसांनी त्यांचे बुकींग झालेच नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी १३ मार्च २०२३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.
अशी मिळाली माहिती
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी बेंडाळे यांना आलेले कॉल, व्हॉटस्अॅप मेसेज, ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले त्यांची माहिती घेऊन सायबर ठगांचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे ठग कोलकाता येथे असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांच्या पथकाने तिघांना अटक केले.