जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२४
देशभर १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तर १६ फेब्रुवारीला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट चालला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. या चित्रपटाला रिलीजच्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्येच बक्कळ कमाई केली आहे.
शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या चित्रपटाने चार दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर ५.१२ कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली. या चित्रपटाच्या टीमनेच सोशल मीडियावर पोस्ट करत आतापर्यंतच्या कमाईचा आकडा सांगितला आहे. निखिल लांजेकरने केलेल्या इन्स्टा पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच ‘शिवरायांचा छावा’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक! धन्यवाद मायबाप प्रेक्षकहो’ या पोस्टच्या माध्यमातून चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहे.
‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटामध्ये अभिनेता भूषण पाटील हा मुख्य भूमिकेत आहे. त्याने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री तृप्ती तोरडमलने महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली आहे. चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. त्याचसोबत या चित्रपटामध्ये विक्रम गायकवाड, रवी काळे, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.
ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या नव्यावर्षात १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.