जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२४
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला धक्का देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. इंदापूर येथील या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. पाटील यांच्या रुपात पवार यांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोडी मानली जात आहे. पाठिमागील काही दिवसांपासून या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, पाटील यांनी आज, 7 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्याचे राजकारण आणि सहकार क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती तसेच, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांच्या महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे काही काळापासून भाजपमध्ये नाराज होते. खास करुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतरित्या महायुतीमध्ये प्रवेश केल्यापासून ही नाराजी वाढली होती. पाटील हे इंदापूर येथून प्रदीर्घ काळ आमदार राहिले आहेत. मात्र, पाठीमागील सलग दोन वेळा त्यांना राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच आता भरणे हे अजित पवार गटाकडे गेले आहेत आणि महायुतीच्या जागाटवाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवदीला सुटण्याची शक्यता आहे.