जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२४
आर्टिफिशल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्याचा येणाऱ्या काळात होणारा उपयोग याची दखल घेवून शैक्षणिक क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करता यावा यासाठी राज्यभरातील प्राध्यापक, संशोधक आणि ग्रंथपालांसाठी ग्रंथालय आणि माहिती शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जन्मदिन तसेच राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्टिफिशल इंटेलिजन्स या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ.आशुतोष पाटील, एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.के.पटनाईक, मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.व्ही.एस कंची, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव डॉ. रत्नाकर गोरे, मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील सर, प्रशासकीय अधिकारी श्री. दिनेश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एस.आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संगीत शिक्षक श्री. सुनील गुरव यांनी वंदे मातरम् सादर केले. कार्यशाळेच्या प्रास्ताविकेतून हितेश ब्रिजवासी यांनी आयोजना मागील उद्देश आणि महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल मांडून नुकतेच महाविद्यालयाने NAAC मूल्यांकन प्राप्त केले असल्याची माहिती देखील सर्व उपस्थितांना दिली. कार्यशाळेच्या बीजभाषणात एसएसबीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.के.पटनाईक यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स ही काळाची गरज असून यावर आधारित विविध तंत्रांचा वापर येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे याबद्दल आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ. व्ही.एस.कंची यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रत्यक्ष संशोधन, अध्यापन आणि ग्रंथालय व्यवस्थापन कार्यातील उपयोगाचे महत्त्व सांगितले तसेच प्रात्यक्षिक सत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विविध टूल्सचा वापर करून अध्यापन, संशोधन आणि ग्रंथालय व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल याचे प्रात्यक्षिक सर्व उपस्थितांना करून दाखविले सर्व उपस्थितांनी देखील यावेळी स्वत: प्रात्यक्षिक करून पाहिले यांसाठी स्वतंत्र संगणकाची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर तिसऱ्या सत्रात काशिनाथ पलोडचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण सोनवणे यांनी AI आणि शैक्षणिक क्षेत्राचे भविष्य या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात सर्व उपस्थित सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेत राज्यभरातून साठ पेक्षा अधिक प्राध्यापक, संशोधक आणि ग्रंथपालांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेत महाविद्यालयाच्या NAAC मूल्यांकन कार्यात मोलाचा वाटा देणारे महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि आय.क्यू.ए.सी समन्वयक प्रा.हितेश ब्रिजवासी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.वैजयंती चौधरी, श्री. हितेंद्र सरोदे यांनी केले तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. हितेश ब्रिजवासी, डॉ. वैजयंती चौधरी, डॉ. संतोष बडगुजर, श्री.सुनील बारी, श्री. प्रदीप सपकाळे आदींनी परिश्रम केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किशोर पाठक, प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.