
जळगाव मिरर | १८ मे २०२५
राज्यातील महामार्गावर अपघातांचे सत्र सुरु असतांना आता नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात निफाड तालुक्यातील पाच जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी घडली. यात लग्न आटोपून घरी परतत असलेल्या वऱ्हाडीच्या कारला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने नवरदेवाच्या लहान भावासह दोघांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत दुचाकीला आयशरने दिलेल्या धडकेत माय- लेकाचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाचा लहान भाऊ नीलेश कराड याच्यासह तुषार कराड (रा. जळगाव) व अक्षय सोनवणे (रा. बोकडदरे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील जळगाव येथील शरद कराड यांच्या मोठ्या मुलाचे लग्न नांदगाव तालुक्यातील कासारी येथे होते. लग्न आटोपून काही वऱ्हाडी मंडळी कारने (एमएच 02, ई.ई. 2309) घराकडे परतत असताना पोखरी गावाजवळ ट्रक व कार यांच्यात भीषण अपघात झाला. यात नवरदेवाचा लहान भाऊ नीलेश कराड याच्यासह तुषार कराड (रा. जळगाव) व अक्षय सोनवणे (रा. बोकडदरे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. दुपारी मोठ्या भावाचे लग्न, तर सायंकाळी लहान भावाच्या अपघाती मृत्यूने कराड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करीत आहेत.
याच दिवशी शिवडी (ता. निफाड) येथील अनिल आहेर हे पत्नी ज्योती व वेदांश यांच्यासह नाशिककडून निफाडकडे दुचाकीवरून जात असताना जळगाव फाट्यावर पाठीमागून आलेल्या आयशरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ज्योती आहेर (25) व वेदांश (3) या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल आहेर हे गंभीर जखमी झाले आहेत.