जळगाव मिरर | २९ फेब्रुवारी २०२४
शहरातील वाल्मिक नगरात अवैधरित्या हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या विजय बाबुराव तायडे (रा. वाल्मिक नगर) याच्या सोमवारी रात्री शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिक नगरात सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास संशयित विजय तायडे हा तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ विजय खैरे, अनिल कांबळे, राहुल पाटील, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाला कारवाई च्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने विजय तायडे याला अटक करीत त्याच्याजवळून तलवार हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.