जळगाव मिरर | १९ एप्रिल २०२५
राज्याच्या राजकारणात सध्या काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही नुकतेच आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. यापूर्वी राज यांनी स्वतःहून पुढे येत उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव यांच्यासोबत युती करण्याचे सकारात्मक संकेत दिलेत. ‘महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, भांडणे व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही,’ असे ते म्हणालेत.
राज ठाकरे यांनी अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वॅको सॅनिटी या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर परखड भाष्य केले. यावेळी महेश मांजरेकर यांनी त्यांना एकेठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्न केला. त्यावर राज यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘प्रश्न असा आहे की, कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद आमच्यातील भांडणे हे अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहेत.
त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही. पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. हा माझ्या काही एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहिला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केले पाहिजे असे मला वाटते.’
महेश मांजरेकर यांनी यावेळी राज यांना एकत्र येणे शक्य नसेल तर तुम्ही शिंदे सेना अर्थात शिवसेना टेकओव्हर करण्यास हरकत नव्हती असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ‘मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की, शिंदेंचे बाहेर जाणे किंवा आमदार फुटणे हा राजकारणाचा एक वेगळा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा अनेक आमदार, खासदार माझ्याकडे आले होते. मला त्याचवेळी हे शक्य होते. पण माझ्या मनात एकच गोष्ट होती की, मी बाळासाहेब सोडले तर मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. त्यावेळची परिस्थिती अशी होती.
परंतु, मी शिवसेनेत होतो तेव्हा मला उद्धव सोबत काम करण्यास काहीही हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी त्याच्याबरोबर काम करावे, असे ते म्हणाले. त्यावर मांजरेकर यांनी अशी महाराष्ट्राची इच्छा असल्याचे सांगितले. त्यावर पुन्हा राज ठाकरे यांनी त्यांनी तसे महाराष्ट्राला सांगावे. मी अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझा इगो केव्हाच आणत नाही,’ असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी मनसे आणि भाजप एकत्र येणे गरजेचे आहे का? या प्रश्नावरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी जे महाराष्ट्राविषयी किंवा मराठी माणसासाठी बोलू शकतो, करू शकतो, ज्या प्रकारचा सापळा तोडू शकतो. भाजपसोबत मी बरोबर येणे हे राजकीय होईल. परंतु सगळ्याच वेव्हलेंथ आमच्या जुळतील असे नाही. पण आता राजकारणात कोणत्या गोष्टी केव्हा घडतील हे काही सांगता येत नाही. उद्या आमच्याशी शेकहँडही केला जाईल. किंवा समोरासमोर येऊन हात जोडलेही जातील. कल्पना नाही. राजकारणात सर्वच गोष्टी बदलत असतात. आता तर इथे सर्वच गोष्टींना एवढा वेग आला आहे की, त्यात कधी कोणती गोष्ट होईल सांगता येत नाही.’
