जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२४
मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा येथे पट्टेदार वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या वडिलांना भेटू दिले नाही म्हणून आठवीत शिकणाऱ्या सोम रहिम पवार (वय १४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हलखेडा येथे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पट्टेदार वाघाची शिकार करून त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याचा प्रकार २९ जुलै अर्थात जागतिक व्याघ्र दिवसाला उघडकीस आला होता. यात सिमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी नशिराबाद टोल नाक्याजवळ वाघाची कातडी घेऊन तस्करी करणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे प्रकरण वन विभागाकडे सोपवण्यात आले होते. संशयित सहापैकी चार जण हे मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी २ ऑगस्ट रोजी सकाळी वन विभागाचा ताफा संशयित आरोपी म्हणून ताब्यात असलेल्या रहिम पवार यांना घेऊन हलखेडा येथे आला होता, या वेळी संपूर्ण गाव जमा झाले होते. तपास कार्य पार पाडल्यानंतर हा ताफा निघून आला. त्यानंतर रहिम पवार यांचा आठवीत शिकणारा लहान मुलगा सोम रहिम पवार याने घरासमोर असलेल्या कोंबड्याच्या शेडजवळ गळफास लावून आत्माहत्या केल्याची मोठी दुर्दैवी घटना घडली.
हि घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कुहा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले. मोठ्या मुश्किलीने दुपारी ३ वाजता त्यांनी सोमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ दिला. पोलिस निरीक्षक मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि जमावाला शांत केले.