जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२३
राज्यातील आग लागण्याच्या घटना नियमित घडत असतांना राज्याला हादरविणारी घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या भीषण आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांची नावे समोर आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यात चिमणाराम बेणाराम चौधरी(वय 48), नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15) आणि सचिन चिमणाराम चौधरी(वय 13) अशी मृतांची नावे असून सदर कुटुंब हे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं. अग्निशमन विभागाच्या जवानांनी चारही जणांचे मृतदेह बाहेर काढले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर माहिती मृतांच्या नातेवाईकांकडे विचापूस केल्यानंतर मिळाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.