जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२४
मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील यशवंत ज्ञानेश्वर बागल (वय ४६) या तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २० रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, सततची होणारी नापिकी आणि कर्जामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुह्या गावापासून जवळच असलेल्या धामणगाव येथील यशवंत बागल हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतात कष्ट करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, सतत होणारी नापिकी आणि त्यामुळे वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे नैराश्यात येऊन त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यशवंत बागल यांच्या पश्चात पत्नी व ४ मुली असा परिवार आहे. तर घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. ही माहिती वाऱ्यासारखी गावासह परिसरात पसरतानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.