जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४
पती चेन्नई येथे गुरु महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते, तर वृद्ध महिला धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या होत्या. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा खिडकीचे ग्रील कापून घरफोडी केली. याठिकाणाहून सुमारे ८० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण सुमारे पावणेचार लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रिंगरोड परिसरातील लोकमान्य हौसिंग सोसायटी परिसरात शशिकला कांतीलाल कटारिया (वय ६४) या वृद्ध महिला पतीसह वास्तव्यास आहे. रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कांतीलाल कटारिया हे गुरु महाराज यांच्या दर्शनासाठी चेन्नई येथे गेले आहेत तर वृद्ध महिला या साडेसात वाजता धार्मिक कार्यक्रमासाठी गणपती नगरात गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वृद्ध महिला घरी परतल्यानंतर त्यांना घरातल्या बेडरुमधील लाईट सुरु दिसला. त्यामुळे त्या बेडरुममध्ये गेल्या असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच पाठीमागे असलेल्या खिडकीचे ग्रील देखील तुटलेले दिसून आले.
चोरट्यांनी कटारिया यांच्या घरातून ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलस, ३० ग्रॅमचा सोन्याच्या पाटल्या, १० ग्रॅमचे कानतले जोड, १० ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठया, २०० ग्रॅमचा चांदीचा गणपती, ३०० ग्रॅमचा चांदीचे साखळ्यांचे जोड ३५० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के आणि १ लाख ५० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक राकेश मानगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख, सलिम तडवी, मिलींद सोनवणे, अजय अहिरे, प्रशांत सैंदाणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संजय हिवरकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.