जळगाव मिरर | १४ जून २०२५
शहरातील तांबापुरा परिसरातून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून मुलाला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवारी दि.१२ जून रोजी दुपारी चार वाजता अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तांबापुरा भागातील हा १३ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. बुधवार, दि.११ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर असताना. अज्ञात व्यक्तीने त्याला काहीतरी आमिष दाखवले आणि फूस लावून पळवून नेले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सर्व प्रयत्न करूनही मुलगा न सापडल्याने, अखेर त्याच्या पालकांनी गुरुवारी १२ जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तांबापुरा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहेत.




















