जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२४
दहशत माजविण्यासाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांच्या सापळा रचून पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई फॅक्टरी फाटा हतनूर रोडवर रविवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश यांनी दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथून जवळच असलेल्या हॉटेल चायला जवळ संशयीत येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली. त्यानुसार पीएसआय रामदास गांगुर्डे, पोहे कॉ यासिन पिंजारी, मनोज म्हस्के प्रेमचंद सुरवाडे, ईश्वर तायडे, भूषण माळी, गोपीचंद सोनवणे, साहेबराव कोळी यांच्या पथकाने सापळा रचला. रविवार सायंकाळच्या सुमारास संशयित सिध्दार्थ संतोष भालेराव (वय २३, आंबेडकर नगर, मुक्ताईनगर) व अनिरूध्द कैलास ठाकूर (वय २० सुराणा नगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून २५ हजार रुपयांचा गावठी कट्टा व दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मनोज म्हस्के यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.