जळगाव मिरर | ६ सप्टेबर २०२४
भुसावळ शहरातील नाहाटा चौकात ३ लाखांच्या नोटा चालनात आणण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई करुन अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३ लाखांच्या नकली नोटा व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून रात्री ११.३० वाजता तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यातर्फे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव व रावेर येथील संशयित आरोपी भुसावळ येथे ३ लाखाच्या बनावट नोटा हस्तांतरण करण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पी. आय. राहुल वाघ, पीएसआय राजू सांगळे, हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, नीलेश चौधरी, पोलीस शिपाई प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, दिलीप कोल्हे, राहुल वानखेडे, भूषण चौधरी या पथकाने नाहाटा कॉलेज परिसरात सापळा रचला. त्यानंतर जळगावच्या शिवाजी नगरमधील उस्मानिया पार्कमध्ये राहणाऱ्या सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८), जळगावच्या सुभाष चौकातील नदीम खान रहीम खान (वय ३०) तसेच रावेर येथील रसलपूर रोडवरील अब्दुल हमीद चौकातील अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७) यांना नोटा विकताना रंगेहाथ पकडले. हे सर्व दुचाकी (एमएच १९, सीडी ५४०३) ने भुसावळ शहरातील नाहाटा चौकात आलेले होते. या संशयितांना दुचाकीसह पथकाने ताब्यात घेतले.
भुसावळ शहरात पोलीस पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने तिघांना बनावट चलनी नोटांसह बेड्या ठोकल्या. संशयित हे एका लाखाच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाखाच्या बनावट चलनी नोटा देणार होते. बुधवारी सायंकाळी संशयितांनी तीन ठिकाणे बदलवून त्यांनी एका ठिकाणी व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडून या नोटांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले. यातील संशयित आरोपींवर वरणगाव पोलीस स्टेशन, जळगावचा जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, मलकापूर पोलीस स्टेशन, जळगावच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन याठिकाणी ही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी या तिघांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.