जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका परिसरात राहणाऱ्या कुटुंबियांनी काहीही कारण नसतांना दुसऱ्या घरावर दगडफेक करीत त्या कुटुंबातील तीन जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील गजानन नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कानळदा रोड परिसरातील गजानन नगरात अशोक किसन ठोसर (वय – ५७) दोन मुलांसह वास्तव्यास असून ते फुटवेअरचे दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता अशोक ठोसर हे जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर पाणी पिण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या मागे राहणाऱ्या काही लोकांनी काहीही कारण नसतांना अशोक ठोसर यांच्या घरासमोर येवून मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ करू लागले. त्यानंतर चौघांनी अशोक ठोसर यांच्यासह मुलगा किरण आणि मुलगी आश्विनी यांना मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या मध्ये किरण याला लाकडी दांडाने मारहाण केली तर अश्वीनीच्या डोक्यात कुंडी मारून फेकली. तर काही अनोळखी १० ते १२ जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक करून सामानांचे नुकसान केले. याप्रकरणी अशोक ठोसर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून १० ते १२ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.