
जळगाव मिरर | ११ मे २०२६
रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि माणुसकीचा प्रत्यय देणारी घटना देवळाली रेल्वे स्थानकावर घडली. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका हरवलेल्या तरुणाला तिकीट तपासनीसाने (टीसी) योग्य मदत करून त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुशीनगर एक्सप्रेस ही गाडी रात्री सुमारे १० वाजून १० मिनिटांनी देवळाली रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणी सुरू असताना तुषार शरद मोकळ (वय २९, रा. ठाणे, मुंबई) हा तरुण संशयास्पद व घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्याकडे प्रवासाचे तिकीट नव्हते. तसेच तो नेमका कोणत्या ठिकाणी उतरला किंवा कुठे जायचे आहे, याबाबतही तो स्पष्ट माहिती देऊ शकत नव्हता.
तिकीट तपासनीसाने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे लक्षात आले. त्याला मुंबईला जाण्यासाठी दुसऱ्या गाडीत बसण्याचा सल्ला देण्यात आला, मात्र तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याने कुठेही जाण्यास तयार नव्हता.
यानंतर संबंधित टीसीने मानवतेचा परिचय देत त्या तरुणाला आपल्या कार्यालयात नेले आणि त्याच्याकडून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यावेळी तुषारची आई कमला शरद मोकळ यांनी आपल्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती दिली. तसेच “कृपया माझ्या मुलाची काळजी घ्या, आम्ही तात्काळ देवळालीला पोहोचत आहोत,” अशी विनंतीही त्यांनी केली.
त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तुषारला कार्यालयात सुरक्षित ठेवत त्याची जेवणाची व इतर आवश्यक सोय केली. दरम्यान, तुषारचे वडील वारले असून कुटुंबात आई आणि भाऊ अभिषेक शरद मोकळ असे सदस्य असल्याची माहिती समोर आली.
रात्री सुमारे ४ वाजेच्या दरम्यान तुषारची आई आणि भाऊ वाहनाने देवळाली रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वेच्या नियमानुसार विनातिकीट पावतीची प्रक्रिया पूर्ण करून तसेच आरपीएफ जवानांच्या उपस्थितीत तुषारला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे रेल्वे प्रशासनातील संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन घडले असून संबंधित तिकीट तपासनीसाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.






















