जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२४
भुसावळ शहरातील गुरुद्वाराजवळील कुलकर्णी प्लॉटमध्ये कपडे सुकवण्यासाठी वरच्या माळ्यावर दोरी बांधताना तोल जावून पहिल्या माळ्यावरून खाली जमिनीवर पडल्याने डोक्याला मार लागून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २८ रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गुरुद्वाजवळील कुलकर्णी प्लॉटमधील मनप्रीतकौर अमरजीतसिंग ठेठी (वय ५५) असे मयत महिलेचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनप्रीतकौर या आपल्या मुलासह गुरुद्वारासमोर वास्तव्यास होत्या. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्या कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या पहिल्या माळ्यावर गेल्या होत्या. मात्र, कपडे टांगण्यासाठी दोरी नसल्याने त्या खुर्चीवर उभ्या राहून दोरी बांधत होत्या. या वेळी त्यांचा तोल गेला व त्या घराच्या पहिल्या माळ्यावरून जमिनीवर पडल्या. या दुर्दैवी अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. दरम्यान, स्थानिकांसह नातेवाईकांना घटना कळताच त्यांनी धाव घेत मनप्रीतकौर यांना रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.