जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
भारतीय चलनाच्या तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणातील दोघे मास्टरमाइंड फरार झाले आहेत. यापूर्वी अटक केलेल्या तिघांकडून या दोघांची नावे समोर आली आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ रोजी रात्री सय्यद मुशायद अली मुमताज अली (शिवाजी नगर, जळगाव) हा त्याचा साथीदार नदीम खान रहिम खान (रा. शनी पेठ, जळगाव) याच्याकडून घेतलेल्या तीन लाख किमतीच्या पाचशेच्या बनावट नोटा घेऊन येत असताना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी त्यास पकडले. अब्दुल हमीद कागल (रा. रसलपूर रोड, रावेर) या नोटा घेताना आढळला होता. वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना ताब्यात घेतले होते.
चौकशी केली असता या नोटा घेण्यासाठी आरोपी राहुल राजेंद्र काबरा (रा. चिखलदरा ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी बऱ्हाणपूर येथे गेला होता व आरोपी प्रतीक नवलखे (रा. मालवीया वार्ड, ब-हाणपूर) याच्याकडून या नोटा घेतल्याचे समजते. आरोपी प्रतीक नवलखे हाच बनावट नोटा छापतो आणि व्यवहार करतो, असे सय्यद मुशायद अली मुमताज अली याने सांगितले आहे. तर, अब्दुल हमीद कादर याने सांगितले की, त्याने पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा लपवून ठेवल्या आहेत. त्याच्या घरातून नोटा जप्त करण्यात आल्या आहेत तर गुन्हा घडल्यापासून राजेंद्र काबरा व प्रतीक नवलखे फरार आहेत.