जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२४
पारोळा शहरातील कासोदा रस्त्यावरील शासकीय आयटीआयजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्दैवी अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील मोरफळ येथील प्रेम आडभंग पाटील (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम पाटील हा आपल्या दुचाकी (एमएच- १८, एक्स ७४८४) ने २९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोरफळ येथून पारोळाकडे येत होता. या वेळी समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १८, सीए ३८४२) ने त्यास जबर धडक दिली. यात प्रेम याचा जागेवरच मृत्यू झाला. तर समोरील दुचाकी चालक फरार झाला आहे. याबाबत अज्ञाताविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र परिवाराने रात्री पारोळा कुटीर रुग्णालयात गर्दी केली होती. प्रेम हा मेहनती व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे गत २ वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ व ५ महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.