जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
राज्यभरासह जळगाव जिल्ह्यात गुंडगिरी वाढत आहे. भाजपचे असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश स्पष्ट दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यासह सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण होणे ही गंभीर बाब असून वाळूमाफियांची गुंडगिरी ही कोणाच्या आशीर्वादामुळे वाढली हा खरा प्रश्न आहे, असा सवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा काँग्रेसने निषेध केला असून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी त्यांचे प्रस्थ वाढवून ठेवले आहे. हे प्रस्थ कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वच सरकारी अधिकारी हे प्रयत्न करीत असतात. मात्र त्यांना दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, वेळ पडली तर त्यांना मारहाण करणे असे प्रकार वाळू माफियांकडून सुरू आहेत. त्यामध्ये आता कहर म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनाच थेट लोखंडी रॉडने मारहाण होऊन त्यांचे वाहन फोडण्यात आले.
अत्यंत गंभीर प्रकार असून याबद्दल सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कुठल्याही प्रकारचा निषेध करण्यात आलेला नाही. त्यांनी या घटनेकडे स्पष्ट दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाळूमाफियांचि हिम्मत आणखी वाढत असून या वाळू माफियांना गुंडगिरी करण्यासाठी नेमका कोणाचा आशीर्वाद मिळत आहे हादेखील महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्व सरकारी अधिकाऱ्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून पाठिंबा असून त्यांनी त्यांचे काम निर्भीडपणे व निष्पक्षपणे करीत राहावे. सामान्य जनता आगामी काळात मस्तवाल आणि गुंडशाहीला पाठिंबा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी देखील माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.