अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तंबाखूची पुडी आणण्याच्या बहाण्याने घरात बोलावून आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) (वय ५२, रा. चुंचाळे, ता. चोपडा) या नराधमाला २० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल गुरुवारी जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने दिला आहे. यामध्ये बंदीला कैदी सुटी मागण्याचे अधिकार नसल्याचे आदेशात नमूद केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात ज्ञानेश्वर रायसिंग याने दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी तंबाखूची पुडी आणण्याच्या बहाण्याने आठ वर्षीय चिमुकलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. दरम्यान, आरोपीचा मुलगा घरी येवून त्याने दरवाजा ठोठावल्याने आरोपीने दरवाजा उघडताच चिमुकली रडत घरी निघून गेली. तीने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितल्यानंतर आजी चिमुकलीला घेवून चोपडा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी ज्ञारेश्वर रायसिंग याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक करीत त्याच्याविरुद्ध ३० दिवसाच्या आत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. आरोपी हा गुन्हा घडल्यापासून जिल्हा कारागृहात बंदी होता. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सफौ उदयसिंग साळु के, पोहेकॉ हिराला पाटील, पोकॉ सतिष भोई, राहूल रणधीर, नितीन कापडण यांनी कामकाज पाहिले.