
जळगाव मिरर । २८ डिसेंबर २०२२
राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर आले. तब्बल १४ महिन्यांनी त्यांची सुटका झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर नेते, कार्यकर्त्यांनी देशमुख यांचे जोरदार स्वागत केले. मुंबईतील हुक्का पार्लर बारकडून दरमहा 100 कोटी रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. ईडीप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची सीबीआय चौकशीही सुरू होती.
जेलमधून बाहेर येताच अनिल देशमुख म्हणाले की, मला खोट्या आरोपाखाली फसवण्यात आले. माझ्यावरील आरोप फक्त ऐकीव माहितीवर होते. सचिन वाझेच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासारखे नाही. आम्हाला न्याय देवतेने न्याय दिला. त्यामुळे न्यायदेवतेचे मी आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला आणि सहकार्य केले. त्यांचे मी आभार मानतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनास आणखी स्थगिती देण्याची सीबीआयची विनंती मुंबई हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे देशमुख यांची आज बुधवारी आर्थर रोड जेलमधून सुटका झाली. सुप्रीम कोर्टास नाताळच्या सुट्या असल्याने जामिनास विरोध करणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी न झाल्याने देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
अनिल देशमुख यांच्या स्वागताला जाण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान उपलब्ध करून दिले. यावर चर्चा सुरूय. याबद्दल अजित पवार म्हणाले की, आज दुपारी 1 वाजता मी व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मुंबईला आलो आहोत. त्याच विमानाने पुन्हा आजच नागपूरला परतणार आहोत. शासकीय विमाने कुणाला वापरायला द्यायची, हा सर्वस्वी अधिकार राज्यांच्या प्रमुखांना असतो. तसेच, मी देखील विरोधी पक्षनेते व कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे ही सुविधा वापरण्यात गैर काहीच नाही. माध्यमांना यावर भाष्य करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर मी टीका करणार नाही.





















