जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२६
पाचोऱ्याहून ओझरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक बसून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाचोरा शहरावर शोककळा पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी मयूर महेंद्र सोनवणे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयूर हा खासगी कामानिमित्त दुचाकी (एमएच-१९ ईएफ-२५१७) ने पाचोऱ्याहून ओझरकडे जात होता. दरम्यान, अज्ञात कारणामुळे दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले.
धडक इतकी भीषण होती की मयूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस ठाणे येथील पोलीस कर्मचारी राहुल शिंपी व शरद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मयूर हा ढोलताशे वादनासाठी परिसरात परिचित होता. सण-उत्सव आणि सामाजिक कार्यक्रमांत तो सक्रिय सहभाग घेत असे. तसेच नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
मयूर यांच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले होते. तो मावशीकडे वास्तव्यास होता. पश्चात एक बहिण असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता तरुण अचानक गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे शहरात शोककळा पसरली आहे.





















