जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२६
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात एका तरुणाने लोखंडी तलवार हातात घेऊन दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पाचोरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणास अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना एक तरुण तलवार घेऊन जारगाव चौफुली परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची गंभीर दखल घेत पो.नि. पवार यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच संशयित सोमनाथ वना पाटील (वय १९, रा. हनुमाननगर, पाचोरा) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. परिसरात अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात आठवड्यातील ही सलग दुसरी कारवाई असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा अंकुश दिसून येत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राहुलकुमार पवार, पो.उ.नि. कृष्णा घायाळ तसेच पोलीस कर्मचारी संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील व हरीश परदेशी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.





















