
जळगाव मिरर | २२ मार्च २०२६
मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. शनिवारी चांदीच्या दरात तब्बल ९ हजार रुपयांची घसरण झाली असून, चांदीचा भाव आता २ लाख ३१ हजार रुपये प्रति किलोवर आला आहे. तर सोन्याच्या दरातही ४ हजार २०० रुपयांची घट होऊन तो १ लाख ४४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे.
गेल्या १० दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असून, ११ मार्चपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत एकूण २० हजार ७०० रुपयांची मोठी घट झाली आहे. ११ मार्च रोजी ४ हजार रुपयांनी घसरून १ लाख ६१ हजारांवर आलेले सोने, पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने घसरत गेले. २० मार्च रोजी ५०० रुपयांची किरकोळ घट झाल्यानंतर २१ मार्च रोजी तब्बल ४ हजार ७०० रुपयांची मोठी घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे दर थेट १ लाख ४४ हजार ३०० रुपयांवर आले आहेत.
दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठे चढ-उतार सुरू आहेत. १९ मार्च रोजी २२ हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर २० मार्च रोजी ७ हजार रुपयांची वाढ झाली होती, ज्यामुळे चांदी २ लाख ४० हजारांवर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर २१ मार्च रोजी पुन्हा ९ हजार रुपयांची घसरण होत चांदी २ लाख ३१ हजार रुपये प्रति किलोवर स्थिरावली.
सततच्या घसरणीमुळे सोन्याचे दर दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. यापूर्वी १८ जानेवारी रोजी सोन्याचा भाव १ लाख ४० हजार ६०० रुपये होता. तर चांदीचे दरही तीन महिन्यांच्या नीचांकीवर आले असून, २६ डिसेंबर २०२५ रोजी चांदीचा भाव २ लाख ३२ हजार ५०० रुपये होता.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सुवर्ण बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः अमेरिका, इराण आणि आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर होत आहे. आगामी काळातही बाजारातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















