
जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२६
शहरातील आकाशवाणी चौक परिसरात ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोर ठेवलेल्या कुरीयर पार्सलमधून मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चार मोबाईल हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोर ठेवलेल्या कुरीयर बॉक्समधून पाच मोबाईल चोरीस गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करताना जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. पोलीस हवालदार महेंद्र पाटील, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, तेजस मराठे, प्रवीण जाधव, प्रशांत लाड आणि चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने संशयिताचा माग काढला.
तपासादरम्यान ही चोरी एका अल्पवयीन मुलाने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ९६ हजार ९९६ रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत असून, शहरातील नागरिकांनीही आपल्या वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलिसांकडून सुरू आहे.





















