
जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन स्वतंत्र कामांचे कंत्राट एका अशा व्यक्तीकडे दिल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित व्यक्ती ही विभागातीलच एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सून असल्याची चर्चा रंगली असून त्यामुळे विभागातील निविदा प्रक्रिया, नियमांचे पालन याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका वसतिगृह परिसरातील अंतर्गत रस्ता दुरुस्ती तसेच एका कार्यालयाचे रंगकामाचे काम मंजूर करण्यात आले आहे. या दोन्ही कामांची एकत्रित किंमत सुमारे १७ लाख रुपयांच्या आसपास असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.
मात्र, या कामांचे कंत्राट ज्या व्यक्तीला देण्यात आले आहे. ती व्यक्ती विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याशी कौटुंबिक नात्याने संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विभागाशी संबंधित किंवा प्रभावशाली संबंध असलेल्या व्यक्तींना थेट अथवा अप्रत्यक्ष लाभ मिळत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागात काही आचारसंहिता आणि प्रशासकीय नियम लागू असतात. विभागातील अधिकारी, त्यांचे निकटवर्तीय किंवा कुटुंबीय यांच्या सहभागाबाबत पारदर्शकता आवश्यक मानली जाते. अशा परिस्थितीत संबंधित प्रकरणात नियमांचे पालन झाले का, निविदा प्रक्रिया निष्पक्ष होती का आणि संबंधित व्यक्तीची पात्रता व निविदेतील सहभागाची पडताळणी करण्यात आली का, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही काम आदेश एकाच दिवशी जारी करण्यात आले असून कामाचा कालावधी आणि अटीही जवळपास समान असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरली होती का, असा संशयही व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी, निविदा प्रक्रियेची तपासणी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची पडताळणी करण्याची मागणी आता विविध स्तरांतून होत आहे. सार्वजनिक निधीतील कामांमध्ये पारदर्शकता आणि नियमबद्धता राखणे आवश्यक असताना, अशा प्रकारच्या आरोपांमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






















