जळगाव मिरर | 6 ऑगस्ट 2026
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) उद्योग व व्यापार आघाडीचे माजी प्रदेश सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे. लवकरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळख असलेले हर्षवर्धन खैरनार हे गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात पुनरागमन करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विकासाभिमुख राजकारणात योगदान देण्यासाठी तसेच जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
युवक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय कार्य करत खैरनार यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले असून, भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीला चालना मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपमध्ये प्रवेशानंतर हर्षवर्धन खैरनार हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्तार, युवकांचे सक्षमीकरण आणि जनहिताच्या विविध विषयांवर सक्रियपणे काम करणार असल्याचे समजते. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अनेक समर्थक आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून, आगामी काळात उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















